माजी विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना राबवण्यात पुढाकार घ्यावा - प्रसाद नामजोशी

माजी विद्यार्थ्यांनी  नवीन संकल्पना राबवण्यात पुढाकार घ्यावा - प्रसाद  नामजोशी





  वरोरा (प्रती )  माजी विद्यार्थिनींचा शाळेकडून झालेला सत्कार ही ऋणानुबंधाची गाठ दृढ असल्याची साक्ष आहे. हा सत्कार  विद्यार्थिनींना नेहमी स्मरणात राहील. हे आत्मीयतेचे बंध कायम ठेवतानाच माजी विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्रसाद नामजोशी यांनी केले. लोकशिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत प्राथमिक ते पदव्युत्तर महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक १९ मार्च रविवारला लोकमान्य प्राथमिक विद्यालयाच्या पटांगणात उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात ते बोलत होते. 
राष्ट्रगीत, प्रार्थना, दीप प्रज्वलन, सरस्वती स्तवन व स्वागत गीताने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद नामजोशी व लोकमान्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे मंचावर उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थिनींचे सुरवातीला घोष पथकातर्फे स्वागत करण्यात आले.
लोकमान्य माजी विद्यार्थी संघ व लोकमान्य कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्मिता धोपटे यांनी आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी यावेळी स्व. बळवंतराव दारापूरकर सरांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्व. दारापूरकर सरांनी ५० वर्षापूर्वी व्हॉलीबॉल या खेळाची मुहूर्तमेढ कन्या विद्यालया च्या प्रांगणात रोवली. 
या ५० वर्षाच्या कालखंडात  शाळेतील अनेक विद्यार्थीनींनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा व संस्थेचा गौरव वाढवला. स्व. दारापूरकर सरांच्या कुशल मार्गदर्शनात तयार झालेल्या या क्रीडापटूंचा व दहावी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थिनीचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नीता गोगटे व आभार प्रदर्शन स्मिता दातारकर यांनी केले.
या मेळाव्यात दुसऱ्या सत्रात "असे घडलो आम्ही "  या कार्यक्रमात प्रसाद नामजोशी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात दोन नामांकित खेळाडूंच्या घेतलेल्या  मुलाखतीने रंगत आणली. शालेय स्तरावर
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या माजी खेळाडू मनी बच्चू व साजिया शेख यांनी  आपली यशोगाथा उत्तरातून सर्वांसमोर प्रकट केली. त्यानंतर माजी  विद्यार्थीनी योगिता लांडगे, वैशाली कोंडावार, स्नेहल लेडे, शुभांगी नक्षीणे, प्राची पदमावार, संगीता नक्षीणे,राणी नरडे व प्रवीण मुधोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. वंदे मातरम् गीताने मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्याच्या निमित्ताने माहेरघरी आल्याचा आनंद माजी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर झळकत होता.

Post a Comment

0 Comments