महामार्गावरील आनंदवन चौक व कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा


महामार्गावरील आनंदवन चौक व कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा 
 
वरोरा(प्रती)
       शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या चंद्रपूर नागपूर दुतर्फा महामार्गावरील अब्दुल कलाम ( रत्नमाला) चौक व आनंदवन चौकात  मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी होत आहे.
          वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी याबाबत महसुल व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या महामार्गावर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी केली आहे.
                    डॉ.अब्दुल कलाम( रत्नमाला) चौकात शहरातून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक,बोर्डा गावाकडून येणारी वाहतूक व सर्विस रोडवरील वाहतुकीने या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यास वाहतूक पोलिसांनाही त्रासदायक होत आहे.आनंदवन चौकातही चिमूर रस्त्याकडून येणारी वाहतूक व वरोरा शहरातून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. आनंदवन चौक ते बोर्डा चौक परिसरात आजतागत अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यांच्या दुतर्फा वसाहती झाल्या असून अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखाने , हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. 
         दिवसेंदिवस या चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असून या चौकामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे ,मुख्याधिकारी गजानन भोयर यांचेशी चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम ,मनोहर स्वामी,सलीम पटेल आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments