आनंदवनात दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता विपश्यना शिबिर

आनंदवनात दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता विपश्यना शिबिर


२०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ 





आनंदवन /वरोरा
       कर्णबधिर, अस्थिव्यंग, अंध विद्यार्थ्यांना ध्यान साधनेचा अभ्यास करून गुणवत्ता वाढवता यावी व चारित्र्यसंपन्न सुजाण नागरिक घडावेत या दिव्य हेतूने आनंदवनतील आनंद मूकबधिर विद्यालय आणि संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा येथे विद्यार्जन करणा-या मुला- मुलींकरीता ‘ आनापान सति ’ हे विपश्यना शिबिर दि.6 डिसेंबर 2022 ला आनंदवनातील संस्कार सदन येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ शाळेतील 200 विद्यार्थी व त्यांच्या शिक्षक- कर्मचा-यांनी घेतला. शिबिराचे कार्यवाहन व मार्गदर्शन करण्याकरीता वि. रा. रूईया मूकबधिर विद्यालय, पुणे या शाळेच्या प्राचार्या व विपश्यना साधिका सौ.संगिता शिंदे – माने या प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे नागपूर,  चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा  येथील अनेक साधक व सेवक याप्रसंगी हजर होते.
    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदनेने या कार्यक्रमाची  सुरवात झाली. सौ. शिंदे ह्या कर्णबधिरांच्या विशेषशिक्षिका असल्याने त्यांनी भाषा खूणा पद्धती, शब्दचिट्टया व प्रोजेक्टर यांचा योग्य वापर करून ‘आनापान सति’ या ध्यान पद्धतीविषयी सखोल माहिती दिली. श्वास आत येणे, श्वास बाहेर जाणे, लांब श्वास, आखूड श्वास, कोणताही जप, तप , नामस्मरण न करता श्वास अनुभवणे या संबंधी प्रात्यक्षिक करून घेतले. विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरूजी यांच्या मार्गदर्शनपर अनेक चलचित्रे विद्यार्थ्यांना पाहता व ऐकता आली.
      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. विजय भसारकर व त्यांच्या शिक्षक- कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. मान. प्रितीकमल पाटील चंद्रपूर , विपश्यना साधक हे अनेक दिवसापासून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापकाच्या संपर्कात होते. विपश्यी  सौ. साधना काळे , मजरा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला आनंदवनचे मान.दीपक शिव व कर्मशाळेचे अधिक्षक मान.रवींद्र नलगिंटवार व अनेक ध्यान साधक उपस्थित होते. 
       या कार्यक्रमाला म.से.स.चे सचिव आदरणीय डाॅ.विकासभाऊ व भारतीताई आमटे याचे आशीर्वाद लाभले तसेच म. से.स.चे विश्वस्त मान. कौस्तुभदादा व पल्लवीताई आमटे   तसेच आनंदवनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मान.कविश्वर काका यांचे सहकार्य प्राप्त झाले.

Post a Comment

0 Comments