सुंदर हस्ताक्षरात पोस्टकार्डावर लिहून दिला निमंत्रणातून मतदान जागृतीचा संदेश !

सुंदर हस्ताक्षरात पोस्टकार्डावर लिहून दिला निमंत्रणातून मतदान जागृतीचा संदेश !

परमानंद तिराणिक यांचा आगळा-वेगळा उपक्रम





वरोरा (प्रती)


'उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा.' हा विचार आत्मसात करुन लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. देशाला दिशा देणारे लोक- प्रतिनिधी नागरिक या निमित्ताने निवडूण देतात. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक आयोग मतदारांचे वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती करीत आहे. जनजागृतीचाच एक भाग म्हणून आनंदवन येथील अंध विद्यालयाचे कलाशिक्षक आचार्य परमानंद तिराणिक यांनी चक्क पन्नास पैशाच्या पोस्टकार्डवर 'लोकशाहीचा शुभविवाह' ही आग्रहाचे निमंत्रण पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून 'हातभर तक्रारींचा बोटभर उपाय' म्हणत मतदारांना प्रत्यक्षात मतदान करायला यायचं हं.. असा भारतीय मतदारांना ज्यांनी वयाची १८ वर्ष पुर्ण केली आहे अशांना मतदान करण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. फिकट पिवळ्या रंगाच्या पोस्टकार्डावर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनांनी वार, दिनांक, स्थळ व वेळ ही बोल्ड मोठ्या ठळक अक्षरांमधे दिसेल अशी क्रमवार रचना करून वय वर्ष १८ वरील महाविद्यालयीन विद्यार्थी, दिव्यांग बांधव शालेय विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना 'प्रिय आई बाबा' माझ्या उज्वल भविष्यासाठी मतदान करा असा मतदान जागृतीचा संदेश दिला आहे, तर पोस्टकार्डाच्या दुसऱ्या बाजुला मतदानावेळी आपले ओळख पत्र म्हणून ग्राह्य असलेले या दहा ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र स्वतः सोबत बाळगा हे सुद्धा त्यांनी आवर्जुन लिहिले आहे.

आचार्य परमानंद तिराणिक हे पुरस्काराचे शतकवीर असून ते दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणूकीत संविधानाने बहाल केलेला अधिकार वापरून सर्व मतदारांनी मतदान करावे. यासाठी प्रशासनाच्या वतीने गावा-गावात विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग हा कार्यक्रम राबविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवायचे असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या फेरीचाही समावेश आहे. जे शालेय विद्यार्थी सज्ञान देखील नाहीत त्यांना घेऊन मतदान जनजागृती फेरी का काढायला सांगितले जाते आहे, असा सवाल सुध्दा आचार्य परमानंद तिराणिक यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments